नवी दिल्ली – टाळेबंदी 1 खुली होताना पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीने महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोलचे दर शुक्रवारी प्रति लिटर 56 पैशांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर 63 पैशांनी वाढले आहेत. गेल्या 13 दिवसात पेट्रोलचे दर प्रति लिटर हे 7.11 रुपयांनी महागले आहे. तर डिझेलचे दर प्रति लिटर हे 7.67 रुपयांनी महागले आहे.
दिल्लीकरांना प्रति लिटर पेट्रोलसाठी 78.37 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेलसाठी 77.06 रुपये प्रति लिटरवर द्यावे लागणार आहेत. हे दर सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी वेबसाईटवर दिले आहेत. देशातील विविध राज्यांनी इंधनावरील व्हॅट वाढविल्याने तेथील दर आणखीन जास्त आहेत.
यापूर्वी 82 दिवस टाळेबंदीत इंधनाची दरवाढ झाली नव्हती. टाळेबंदीचा पहिला टप्पा खुला होत असतानाच सरकारी तेल कंपन्यांनी 7 जूनपासून इंधनाच दर वाढिण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा हा तेरावा दिवस आहे.
केंद्र सरकारने मार्चमध्ये इंधनावरील उत्पादन शुल्क वाढविले होते. त्यावेळी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे दर वाढविले नव्हते. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर घसरलेले होते.
दरम्यान, काँग्रेसने पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. हे दर ऑगस्ट 2014 प्रमाणे लागू करावेत, अशी काँग्रेसने सरकारकडे मागणी केली आहे. दुसरीकडे ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट मोटर्स असोसिएशनने पेट्रोल व डिझेलचे दर वाढत असल्याने सरकारचा नुकतेच निषेध केला आहे.