नवी दिल्ली - जेट एअरवेज बंद झाल्यानंतर देशातील विमान सेवांमध्ये काहीअंशी पोकळी निर्माण झाली आहे. ही कमतरता भरुन काढण्यासाठी व उन्हाळ्यातील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन एअर इंडियाने विमान सेवा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कंपनी असलेली एअर इंडिया ही दिल्ली-दुबई, मुंबई-दुबई आणि दिल्ली-मुंबई या मार्गावरील विमान सेवेत वाढ करणार आहे.
विमान प्रवाशांची सर्वात अधिक भारत-दुबई या मार्गावर प्रवासासाठी मागणी असते. या मार्गावर जूनच्या पहिल्या आठवड्यात बी ७८७ या विमानाची सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. दुबईला जाणाऱ्या विमान सेवा सुरू होणार आहेत.
केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाने एअर इंडियाला आठवड्यासाठी ५ हजार ७०० आसनांचा कोटा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या बाजारपेठेत एअर इंडियाचा १३.१ टक्के हिस्सा आहे. मार्चमध्ये एअर इंडियाने १५ लाख १९ हजार कर्मचाऱ्यांना विमान प्रवासाची सेवा दिली आहे.