मुंबई - कोरोनामुळे बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पुढील १२ महिने ग्राहकांचे ईएमआय (मासिक हप्ता) स्थगित करा, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री- क्रेडाईने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. तसेच विकासकांच्या कर्जावरील व्याजाला स्थगिती द्यावी, अशी मागणीही एमसीएचआय क्रेडाईने केली आहे.
गृहकर्ज काढून घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातही यात अत्यल्प आणि अल्प गटातील ग्राहकांचा भरणा मोठा आहे. गृहकर्ज घेणाऱ्यांमध्ये मोलमजुरी व इतर रोजगार तसेच खासगी कंपन्यामध्ये काम करणारे लोक आहेत.
हेही वाचा-भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून ६ लाखांचे बनावट सॅनिटायझर जप्त; पाच आरोपींविरुद्ध गुन्हा
गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मुंबईसह राज्यातील दुकान, बाजार, हॉटेल इतर सर्व सेवा बंद आहेत. त्यामुळे अनेक गृहकर्जदारांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यापुढेही ही परिस्थिती किती काळ सुरू राहणार हे अनिश्चित आहे. त्यामुळे सर्व गृहकर्जदारांच्या १२ महिन्यांच्या ईएमआयला स्थगिती द्यावी, अशी मागणी एमसीएचआय क्रेडाईने पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.
हेही वाचा-VIDEO: भारत 'स्टेज-२' च्या उंबरठ्यावर..जाणून घ्या काय आहेत 'कोरोना स्टेजेस'
गेल्या कित्येक वर्षांपासून बांधकाम व्यावसायिक मंदीची झळ सोसत आहेत. त्यात आता कोरोनामुळे आर्थिक संकट आले आहे. तेव्हा विकसकांच्या कर्जावरील १२ महिन्याच्या व्याजालाही स्थगिती देण्याची मागणी केल्याची माहिती बांधकाम व्यवसायिक राजेश प्रजापती यांनी दिली आहे. विकसकांना ६ महिन्यांसाठी शून्य टक्के मुद्रांक शुल्क आकारावे तसेच १२ महिन्यांसाठी मालमत्ता कर कमी करावा, अशी ही मागणी पत्रात करण्यात आली आहे. ही मागणी मान्य झाली तर गृहकर्जधारकांना मोठा दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे.