नवी दिल्ली - मारुती सुझुकी इंडियाच्या एकूण विक्रीत ऑक्टोबर महिन्यात 18.9 टक्के वाढ झाल्याची नोंद झाली.
गेल्या महिन्यात-ऑक्टोबरमध्ये कंपनीने 1 लाख 82 हजार 448 चारचाकींची विक्री केली होती. तर, गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये 1 लाख 53 हजार 435 चारचाकींची विक्री झाली होती.
इतर मूळ उपकरणे उत्पादक (ओईएम) च्या विक्रीसह कंपनीची देशांतर्गत विक्री 1 लाख 72 हजार 862 होती. ती वर्षाच्या तुलनेत विचार केला असता, 19.8. टक्क्यांनी अधिक राहिली.
मारुती सुझुकीने ऑक्टोबरमध्ये देशात 1 लाख 63 हजार 656 प्रवासी वाहने विकली. यामध्येही 17.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हेही वाचा - ह्युंदाई मोटर इंडिया 5 नोव्हेंबरला लाँच करणार 'ऑल-न्यू आय 20'
दरम्यान, अल्टो आणि एस-प्रेसोसह मिनी सेगमेंट कारच्या विक्रीत 0.3 टक्क्यांची घसरण झाली. यापैकी 28 हजार 462 गाड्यांची विक्री झाली. तर, कॉम्पॅक्ट विभागातील विक्री 26.6 टक्क्यांनी वाढून 95 हजार 67 वाहनांवर गेली.
मारुतीच्या कॉम्पॅक्ट सेगमेंटमधील मॉडेल्समध्ये वॅगनआर, स्विफ्ट, सेलेरिओ, इग्निस, बॅलेनो, डिझायर आणि टूर एस या चारचाकी समाविष्ट आहेत.
गेल्या महिन्यात हलक्या व्यावसायिक वाहनांची-सुपर कॅरीची विक्री देखील 30.5 टक्क्यांनी वाढून 3,169 वाहनांवर पोहोचली.
ऑक्टोबरमध्ये कंपनीच्या निर्यातीतही वाढ झाली. परदेशात 9 हजार 586 वाहने विकली गेली. यातही मागील वर्षाच्या तुलनेत 7.7 टक्क्यांनी वाढ झाली.
हेही वाचा - मारुती सुझुकीचे बलेनो सुस्साट... गाठला ८ लाख विक्रीचा टप्पा!