मुंबई - कोरोना महामारीत अर्थव्यवस्थेला फटका बसला असताना राज्य सरकारने विदेशामधून गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेची इलेक्ट्रिक कंपनी टेस्लाने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, यासाठी कंपनीच्या प्रतिनिधींशी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी चर्चा केली आहे.
टेस्लाच्या प्रतिनिधींशी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी चर्चा केल्याचे आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. देसाई यांनी टेस्लाच्या टीमशी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा झाली. यावेळी देसाई यांनी टेस्लाचा महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करण्यासाठी कंपनीच्या टीमला निमंत्रित केल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. यावेळी आदित्य ठाकरेही बैठकीला उपस्थि होते. त्यांनी ट्विटमध्ये याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले, की मी केवळ गुंतवणूक होण्यासाठी नव्हे तर इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि शाश्वता यावर विश्वास असल्याने उपस्थित होतो, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. शाश्वत विकास आणि धोरण विकिसत करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. इलेक्ट्रिक मोबिलिटीने अक्षय्य उर्जेला मदत होऊ शकते, असा माझा विश्वास आहे, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हा मुख्य प्रवाहातील विचार होण्यासाठी आम्ही मदत करू शकतो, अशी आपण आशा करू, असेही ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्र हे देशातील आणि विदेशातील वाहन उत्पादकांचे मुख्य केंद्र आहे. यामध्ये पुण्याजवळ असलेल्या चाकण येथील औद्योगिक पट्ट्याचा समावेश आहे.
टेस्लाचा प्रकल्प भारतात पुढील वर्षी येणार-
दरम्यान, टेस्लाचा सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी पुढील वर्षात भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. एवेन्डस कॅपिटलच्या अहवालानुसार देशात इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ २०२५ पर्यंत ५० हजार कोटी रुपयांची होऊ शकते. त्यासाठी बॅटरीची किंमत, चार्जिंग करण्यासाठी पायाभूत सुविधा, धोरण, पुरवठा साखळी हे मुद्दे महत्त्वाचे ठरणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.