हैदराबाद- कोरोना महामारीत नोकरी गमाविलेल्या व येत्या काही महिन्यात नोकरी जाईल, अशा औद्योगिक कामगारांना दिलासा देण्यासाठी सरकारने दिलासा देणारी योजना जाहीर केली आहे. यामध्ये कामगारांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही योजना कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून (ईएसआयसी) अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजना नावाने राबविण्यात येत आहे.
बेरोजगारांना देण्यात येणाऱ्या मदत योजनेचा सुमारे 40 लाख औद्योगिक कामगारांना फायदा होईल, असे ईएसआयसीने म्हटले आहे. त्याविषयी अधिक माहिती जाणून घेवू.
काय आहे अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना?
ईएसआयसीने अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजना (एबीव्हीकेवाय) 1 जुलै 2018 ला लाँच केली होती. ही योजना दोन वर्षे प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली होती. या योजनेत ईएसआयसीमध्ये मासिक योगदान देणाऱ्या व्यक्तीने (इनशुर्ड पर्सन) रोजगार गमाविल्यास आर्थिक मदत देण्यात येते.
ईएसआयसीने गुरुवारी काय घोषणा केली?
ईएसआयसीने योजनेतील पात्रता व निधीत वाढ करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाच्या बैठकीत गुरुवारी मंजुरी दिली आहे. ही योजना एका वर्षाने 30 जून 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यासही ईएसआयसीने मंजुरी दिली आहे.
योजनेचे काय होते निकष?
यापूर्वी कामगार बेरोजगार झाल्यास सरासरी वेतनाच्या 25 टक्के आर्थिक मदत दिली जात होती. कामगार 90 दिवस बेरोजगार राहिल्यास हा भत्ता देण्यात येत होता.
योजनेचे नवीन काय निकष आहेत?
जे कामगार 24 मार्च 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत नोकरी गमावितात, त्यांना वेतनाच्या 50 टक्के आर्थिक मदत दिली जाणार आहे. पूर्वी 90 दिवस कामगार बेरोजगार राहिल्यास देण्यात येणारा भत्ता हा 30 दिवस बेरोजागार राहिल्यानंतर देण्यात येणार आहे.
जर कामगार हा 31 डिसेंबर 2020 नंतर बेरोजगार झाल्यास काय मदत मिळणार?
जर कामगार हा 31 डिसेंबर 2020 नंतर बेरोजगार झाल्यास पूर्वीच्या अटीप्रमाणे तो 30 जून 2021 पर्यंत योजनेसाठी पात्र ठरणार आहे. परिस्थितीचा आढावा घेवून व गरज लक्षात घेवून योजनेचा 31 डिसेंबर 2020 नंतर आढावा घेण्यात येणार आहे.
इन्शुर्ड पर्सन योजनेसाठी कसा दावा करू शकतो?
कामगारांना योजनेसाठी थेट ईएसआयसीमध्ये दावा दाखल करता येणार आहे. त्यासाठी 12 अंकी आधार क्रमांकाचा वापर करता येणे शक्य होणार आहे. योजनेतून मिळणारी रक्कम ही थेट कामगाराच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. ईएसआयसीच्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार हा दावा करण्यासाठी कामगाराच्या कंपनीची आवश्यकता लागणार आहे. कामगाराच्या दाव्याची पडताळणी ही ईएसआयसी कार्यालातून करण्यात येणार आहे.
कोणत्या औद्योगिक कामगारांना योजनेला लाभ मिळणार आहे?
औद्योगिक कामगारांची ईएसआयसीमध्ये नोंदणी झाली असल्यास व कमीत कमी दोन वर्षे नोकरी केल्यानंतर कामगाराला योजनेचा लाभ मिळू शकतो. त्याने ईएसआयसीमध्ये 78 दिवसांहून कमी योगदान दिलेले नसावे.
ईएसआयसी योजनेसाठी कोणते कामगार नोंदणी करू शकतात?
ज्यांचे मासिक उत्पन्न 21 हजारांहून कमी आहे, ते कामगार ईएसआयसीसाठी नोंदणी करू शकतात. दर महिन्याला वेतनातील रक्कम ईएसआयसीसाठी कपात होते. त्यामधून कामगाराला वैद्यकीय लाभ मिळतात.