शिमला (हिमाचल प्रदेश) - भारत आणि चीन सीमा प्रश्नावरून लडाख प्रदेशातील गलवान भागामध्ये दोन्ही देशाचे सैन्य भिडले होते. यावेळी झालेल्या हाणामारीत 43 चिनी सैनिक मारले गेले, तर भारताचे 20 जवान हुतात्मा झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हिमाचर प्रदेश प्रशासनाने राज्यातील काही भागांमध्ये हाय अलर्ट घोषित केला आहे.
हिमाचल प्रदेशातील कन्नूर आणि लहुल स्पिटी जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट घोषीत केला आहे. हे दोन्ही जिल्ह्यांना चीनची सीमा लागते. तसेच येथील स्थानिक सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली असून, सर्वांना सावधान केले गेले आहे. राज्यातील सर्व गुप्तहेर संघटनांना सुद्धा अलर्ट केल्याची माहिती पोलीस प्रवक्ते खुशाल शर्मा यांनी दिली आहे.
कन्नूर जिल्ह्यातील 14 गावांना चीनची सीमा लागते. या गावातील सर्व नागरिकांना कुठलीही हालचाल न करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच भारतीय लष्करांचा कडक बंदोबस्त येथे लावण्यात आला आहे.
भारतीय लष्करी सूत्रांचा हवाला देऊन एएनआयने ट्वीट केले, की सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत भारताचे १७ जवान जखमी झाले होते. पण रात्रीच्या प्रचंड थंडीत त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला तीन आणि नंतर १७ असे २० जवान हुतात्मा झाले. चीनकडील बाजूस मृतदेह वा जखमींना उचलण्यासाठी मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टरे दाखल झाली होती.