नवी दिल्ली – कोरोना महामारीत सर्वच क्षेत्र आणि उद्योगांची पिछेहाट होत असताना केवळ कृषी क्षेत्रातून दिलासादायक बातमी आहे. चालू खरीप हंगामात लागवडीखालील क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत 21 टक्क्यांची वाढ झाली आहे. 16 जुलैपर्यंत 691.86 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे . सरासरी मान्सूनच्या प्रमाणाहून अधिक पाऊस झाल्याने पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गतवर्षी खरीप हंगामात 570.86 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. तृणधान्यांची 81.66 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गतवर्षी खरिपात 61.70 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. तृणधान्याच्या लागवडीत एकूण 32.35 टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा धान्यांची 115.60 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गतवर्षी खरिपात धान्यांची 103.00 हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा खरिपात तेलबियांची 154.95 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. तर गतवर्षी खरिपात 110.09 लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड झाली होती.
गतवर्षी ऊसाची लागवड असलेले क्षेत्र 50.82 लाख हेक्टर वाढून यंदा 51.29 लाख हेक्टर आहे. तर गतवर्षी कापसाची लागवड 96.35 लाख हेक्टर असलेले क्षेत्र वाढून यंदा 113.01 लाख हेक्टर झाले आहे. कपाशीच्या लागवडीच्या क्षेत्रात एकूण 17.28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना महामारीचा खरिपातील कामांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.
देशात 16 जुलैपर्यंत सरासरी 338.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. देशात सरासरी 308.4 मिलीमीटर पावसाचे प्रमाण असते. यंदा मान्सूनचे प्रमाण 10 टक्क्यांनी वाढले आहे.