नवी दिल्ली - उत्पादन प्रक्रियेमधील हालचाली मंदावण्याचे प्रमाण ऑक्टोबरमध्ये कायम राहिले आहे. कारखान्यांच्या कामांचे आदेश आणि उत्पादनाचा वृद्धीदर हा गेल्या दोन वर्षात ऑक्टोबरमध्ये कमी राहिल्याचे एका सर्व्हेमधून समोर आली आहे. आयएचएस मर्किट इंडिया मॅन्युफॅक्चुअरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) हा ऑक्टोबरमध्ये ५०.६ नोंदविण्यात आला. सप्टेंबरमध्ये पीएमआयची ५१.६ टक्के नोंद झाली होती.
पीएमआय ५० हून अधिक झाल्यास उत्पादनात वाढ झाल्याचे मानण्यात येते, तर ५० हून कमी निर्देशांक असणे उत्पादन खुंटल्याचे चिन्ह असते. आयएचएस मर्किट सर्व्हेच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्येही उत्पादन क्षेत्र थंडावलेले राहिले आहे.
हेही वाचा-उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीत घसरण; गेल्या १५ महिन्यात ऑगस्टमध्ये पीएमआयचा निचांक
गेल्या सहा महिन्यात रोजगार निर्मितीचे प्रमाण कमी राहिलेले आहे. कंपन्यांकडे अधिक साठा आहे. तर मागणी कमी असल्याचे आयएचएस मर्किट सर्व्हेत म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षात सर्वाधिक विक्री दर घसरल्याचे दिसून आल्याचे आयएचएस सर्किटचे मुख्य आर्थिक तज्ज्ञ डी लिमा यांनी सांगितले. मागणी कमी झाल्याचा उत्पादन क्षेत्रात एकामागून एक होणारा साखळी परिणाम (डोमिनो इफेक्ट) दिसून आल्याचे लिमा यांनी म्हटले आहे. उत्पादनाच्या खर्चात वाढ, रोजगार आणि व्यवसायाबाबत चिंता निर्माण झाल्याचेही लिमा यांनी नमूद केले. सलग तिसऱ्या महिन्यात मागणी कंत्राटाच्या प्रमाणात घसरण झाली आहे. अशा स्थितीत उत्पादन खर्च (इनपूट कॉस्ट) हा गेल्या चार वर्षात प्रथमच कमी झाल्याचे निरीक्षणही लिमा यांनी नोंदविले.
काय आहे पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स-
पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्समधून उत्पादन आणि सेवा क्षेत्रामधील आर्थिक हालचालींची स्थिती निर्देशांकामधून दाखविली जाते. यामध्ये बाजाराची स्थिती व मागणी इत्यादींचा समावेश आहे. ही माहिती खासगी कंपन्यांचे सर्व्हे करून दर महिन्याला घेतली जाते. यामुळे सध्याची उत्पादन क्षेत्राची परिस्थितीचे आकलन होणे शक्य होते.