ओसाका - हुवाई कंपनीला जी २० परिषदेच्या निमित्ताने मोठा दिलासा मिळाला आहे. चीनच्या हुवाईला अमेरिकन कंपंन्या तंत्रज्ञान विकू शकतात, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते ओसाका येथील जी २० समुहाच्या परिषदेच्या बैठकीला आल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.
हुवाईला देण्यात येणारे तंत्रज्ञान अमेरिकेच्या सुरक्षेला धोका उत्पन्न करणारे नसावे, अशी ट्रम्प यांनी अट घातली आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, हुवाईबाबत आम्ही शेवट करत आहोत. व्यापारी कराराबाबत काय होत आहे, हे आम्ही पाहत आहोत. हुवाईवरील संपूर्ण निर्बंध काढल्यानंतर व्यापार युद्ध संपुष्टात येण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. हुवाईबाबत मंगळवारी बैठक असल्याचे त्यांनी सांगितले. चीन आणि अमेरिका हे रणनीतीमधील भागीदार असल्याचेही त्यांनी म्हटले.
व्यापारी असंतुलन कमी करण्यासाठी चीनने प्रचंड प्रमाणात अमेरिकेच्या वस्तू खरेदी करण्याची तयारी दर्शविल्याचे ट्रम्प यांनी माहिती दिली. तर अमेरिका चीनमधून खरेदी करणाऱ्या वस्तुंची यादी देणार आहे.
अमेरिकेच्या सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत ट्रम्प यांनी हुवाईला १५ मे रोजी काळ्या यादीत टाकले आहे. या निर्णयाविरोधात हुवाईने अमेरिकेच्या न्यायालयात दाद मागितली आहे. नुकताच अमेरिकेने भारतासह इतर देशांना हुवाईच्या उत्पादनांवर निर्बंध घालण्याची विनंती केली होती.