मुंबई - कोरोनाचा प्रसार होत असताना त्याचा परिणाम होवू नये, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने आभासी वॉर रुम तयार केली आहे. यामध्ये केवळ ९० महत्त्वाचे अधिकारी कार्यरत असणार आहेत. त्यामुळे वित्तीय व्यवस्था सुरळित राहण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने बिझिनेस कंटिनजेन्सी प्लॅन (बीसीपी) १९ मार्चला तयार केला आहे. यामध्ये बँकांची बँक असलेल्या आरबीआयचे २४ तास कामकाज सुरू असणार आहे. या यंत्रणेत महत्त्वाचे ९० अधिकारी, बाहेरील सेवा देणाऱ्या मनुष्यबळातील ६९ महत्त्वाचे व्यक्ती आणि इतर ७० कर्मचारी असणार आहेत. कामकाज सुरळित चालू राहण्यासाठी ९० पैकी केवळ निम्म्या जणांना सूचनप्रमाणे तत्काळ हजर राहावे लागणार आहे. तर उर्वरित निम्म्या लोकांना राखीव असणार आहेत.
हेही वाचा-शेअर बाजार ३,१८२ अंशांनी आपटला; गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी पाण्यात
जगामध्ये पहिल्यांदाच एखादी मध्यवर्ती बँक बीसीपीची अंमलबजावणी होत असल्याचे आरबीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. तसेच देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी अंमलबजावणी होत आहे. दुसऱ्या महायुद्धातही मध्यवर्ती बँकेने असे कोणतेही नियोजन केले नव्हते. वॉर रुममध्ये कर्जाचे व्यवस्थापन, राखीव व्यवस्थापन आणि पतधोरणाचे कामकाज होणार आहे. तर आरटीजीएस आणि एनईएफटीसारखी डाटा सेंटरचे कामकाजही वॉर रुममध्ये होणार आहेत.
दरम्यान, कोरोनामुळे देशात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३६० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशाच्या अनेक भागात लॉकडाऊन झाले आहे. जीवनावश्यक वस्तूची विक्री करणारे दुकाने, मेडिकल दुकाने आणि बँकांची कामकाज सुरू आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या लढ्याकरता वेदांत कंपनीकडून १०० कोटींचा निधी