पणजी - कांद्याच्या भाववाढीमुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थांमधून कांदा गायब होणे, असे वृत्त तुम्ही वाचले असेल. पण कांद्याच्या भाववाढीने गोव्यातील पर्यटकांची संख्या घसरल्याचा दावा गोव्याचे बंदर मंत्री मायकल लोबो यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घसरण झाली आहे. भारतीय पर्यटकांकडून जेवणासोबत कांदा आणि मिरचीची विचारणा होते. कांद्याच्या वाढत्या किमतीमुळे त्यांना कोबी आणि मिरची देण्यात येत असल्याचे मायकल लोबो यांनी सांगितले.
लोबो हे कलंगुट विधानसभा क्षेत्रामधील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. कलंगुट हे समुद्री किनाऱ्यांसाठी पर्यटकांमध्ये सर्वात अधिक प्रसिद्ध आहे. लोबो यांच्या मालकीच्या रेस्टॉरंट, लंग बार आणि हॉटेलची साखळी आहे.
हेही वाचा-कांदा प्रतिक्विंटल ५ हजार दर; व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
देशभरातील शहरांबरोबर गोव्यातही कांद्याचे भाव वाढून प्रति किलो १७० रुपयापर्यंत पोहोचले आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कांद्याच्या घाऊक विक्रेत्यांना अनुदान देण्याचे जाहीर केले. त्यामुळे स्वस्त दरात बाजारपेठेत कांदा उपलब्ध होईल, अशी गोवा सरकारला अपेक्षा आहे.
हेही वाचा- कॉर्पोरेट कर १५ टक्क्यापर्यंत कमी करावा- सीआयआयची मागणी
गोवा पर्यटन उद्योगाकडून पर्यटकांची संख्या कमालीची घटल्याची तक्रार करण्यात येत आहे. आर्थिक मंदी आणि इंग्लंडमधील थॉमस कुक या पर्यटन कंपनीच्या बंद होण्याने गोव्यातील पर्यटन क्षेत्रावर परिणाम झाला आहे. गोव्यात पर्यटनासाठी पायाभूत सुविधांची कमतरता असल्यानेही पर्यटनावर परिणाम झाला आहे. गोवा हे समुद्रकिनारी पर्यटनासाठी सर्वात प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. गतवर्षी सुमारे ७० लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती. त्यामधील ५० टक्के पर्यटक हे विदेशामधील होते.