नवी दिल्ली - गेल्या वर्षी भारताने 982 टन सोन्याची आयात केल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत लेखी उत्तरातून दिली आहे. सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्यासाठी काही व्यापारी प्रतिनिधींनी सादरीकरण केल्याचेही त्यांनी सांगितले. हे अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेचा भाग असल्याचे सीतारमण यांनी स्पष्ट केले.
वाणिज्य मंत्रालयाने सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याची शिफारस केल्याचेही निर्मला सीतारामण यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. सोन्याचे आयात शुल्क कमी करण्यासाठी सोने व्यापाऱ्यांनी सादरीकरण करण्यात आले होते, का असा सवाल निर्मला सीतारामण यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सीतारामण यांनी सोने आयातीबाबत विस्तृत माहिती दिली.
सोने आयातीचे प्रमाण 2018-2019 मध्ये 3 टक्क्यांनी घसरून 32.8 अब्ज डॉलर झाले आहे. त्यामुळे वित्तीय तूट किंचितशी कमी होण्यास मदत झाली आहे.
असे आहे सोन्याच्या आयातीचे प्रमाण-
आर्थिक वर्ष | सोने आयातीचे मुल्य (अब्ज डॉलरमध्ये) | सोन्याच्या आयातीचे प्रमाण (टनामध्ये) |
2017-2018 | 33.7 | 955 |
2016-2017 | 27.5 | 778 |
2015-2016 | 31.8 | 968 |
जगात सर्वात अधिक सोने आयात करणाऱ्या देशांपैकी भारत आहे. मुख्यत: ज्वेलरी उद्योगाकडून आयात करण्यात येते. जेम्स आणि ज्वेलरीकडून होणारी निर्यात 2018-19 मध्ये 5.32 टक्क्यांनी घसरली आहे. सोने आयातीवर शुल्क कमी करण्यात यावे व आयात करण्यासाठीच्या नियमात शिथीलता आणावी, अशी देशातील ज्वेलरी उद्योगाकडून नेहमीच मागणी केली जाते.