नवी दिल्ली - कोरोनापूर्वीच्या स्थितीप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था होत असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत. गतवर्षीच्या सप्टेंबरहून चालू वर्षात सप्टेंबरमध्ये वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन झाले आहे. ही माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज जाहीर केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमधील जीएसटीचे संकलन हे गतवर्षीहून ४ टक्क्यांनी अधिक आहे. टाळेबंदीनंतरच्या सहाव्या महिन्यात सप्टेंबरमध्ये जीएसटीचे ९५ हजार ४८० कोटींचे संकलन झाले आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये ९१ हजार ९१६ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते.
- केंद्रीय जीएसटी - १७,७४१ कोटी रुपये
- राज्य जीएसटी - २३,१३१ कोटी रुपये
- एकत्रित जीएसटी (आयजीएसटी)- ४७,४८४ कोटी रुपये (२२,४४२ कोटींच्या उत्पादन शुल्काचा समावेश)
- उपकर -७,१२४ कोटी रुपये
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्चमध्ये टाळेबंदी घोषित केली होती. त्यानंतर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अशातच सप्टेंबरमधील जीएसटीचे संकलन हे सर्वाधिक राहिले आहे.
जीएसटी संकलनात सुधारणा-
टाळेबंदीत संपूर्ण देश असताना मार्चमध्ये सर्वात कमी ३२ हजार १७२ कोटी रुपयांचे जीएसटीचे संकलन झाले. तर मागील वर्षात मार्चमध्ये १ लाख १३ हजार ८६५ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. असे असले तरी एप्रिलनंतर जीएसटी संकलनात सुधारणा होत गेली आहे. एप्रिलमध्ये ६२ हजार १५१ कोटी रुपये तर जूनमध्ये ९० हजार ९१७ कोटी रुपयांचे संकलन झाले आहे. जुलैमध्ये ८७ हजार ४२२ तर ऑगस्टमध्ये ८६ हजार ४४९ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे.