नवी दिल्ली - जर तुम्ही पॅन कार्ड ३१ मार्चपर्यंत आधारला जोडले (link) नसेल, तर चिंता करू नका. केंद्र सरकारने पॅन कार्ड आधारला जोडण्याची मुदत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत वाढविली आहे. मात्र आयकर परतावा मिळविण्यासाठी करदात्यांना पॅनकार्ड हे आधारशी जोडणे बंधनकारक राहणार आहे.
केंद्र सरकारने सहाव्यांदा पॅनकार्ड हे आधारला जोडण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ही माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिली आहे. आधारशी जोडण्यात न आलेले पॅनकार्ड हे अवैध होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मुदतवाढ मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाने आयकर परताव्यासाठी पॅनकार्ड हे आधारला जोडण्यासाठी बंधनकारक असल्याचा निकाल दिला होता. मात्र, दूरसंचार सेवा व बँक खाते काढण्यासाठी ही जोडणी बंधनकारक नसल्याचेही न्यायालयाने निकालात म्हटले होते. सप्टेंबरअखेर देशात ४१ कोटी पॅनकार्ड नागरिकांना देण्यात आली आहेत. तर त्यापैकी २१ कोटी पॅन कार्ड ही आधारला जोडण्यात आली आहेत.