नवी दिल्ली - केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने फेसबुककडे मालकी असलेल्या व्हॉट्सअपला नवीन गोपनीयता धोरण मागे घेण्याचे निर्देश दिले आहे. या गोपनीयतेच्या धोरणाने गोपनीयता, डाटा सुरक्षा आणि भारतीय नागरिकांच्या अधिकाराला हानी पोहोचत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानेचे सचिव आणि वित्तीय सल्लागार ज्योती अरोरा म्हणाल्या, की जर्मनीने व्हॉट्सअपच्या गोपनीयतेच्या धोरणावर बंदी लागू केली आहे. मंत्रालयाला जे करणे शक्य आहे, त्याबाबत आम्ही पाहत आहोत. समस्येबाबत मंत्रालयाला जाणीव आहे. त्या असोचॅमच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
हेही वाचा- व्हॉट्सअपला धक्का! गोपनीयतेच्या धोरणाचा सीसीआय करणार सखोल तपास
फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअपने गोपनीयतेच्या अटी स्वीकारल्या नाही तर १५ मे रोजीनंतर अकाऊंट बंद होणार असल्याचे जाहीर केले होते. अटी स्वीकारल्या नाही तर वापरकर्त्यांना व्हॉट्सअपच्या मर्यादित सेवा घेता येणार आहेत. त्यांना व्हॉट्सअपचे मेसेज आणि कॉलिंग करता येणार नाही. व्हॉट्सअपच्या नियमानुसार १२० दिवस अकाऊंट निष्क्रिय असेल तर वापरकर्त्याचे अकाऊंट बंद करण्यात येते. मात्र, गोपनीयतेच्या अटी न स्वीकारलेल्या वापरकर्त्यांचे अकाऊंट बंद करण्यात येणार नाही.
व्हॉट्सअपने गोपनीयतेचे धोरण जाहीर केल्यानंतर अनेक वापरकर्त्यांनी डाटा सुरक्षित राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली होती. व्हॉट्सअपचा डाटा फेसबुक व इन्स्टाग्रामकडे जाईल, असे अनेक वापरकर्त्यांना वाटत होते.
हेही वाचा-व्हॉट्सअपवरून सल्ला मागणाऱ्या कोरोनाबाधिताकडे ५० हजारांची मागणी; डॉक्टरची हकालपट्टी
वापरकर्त्यांना धोरण अपडेटचे रिमाईंडर मिळत राहणार-
व्हॉट्सअपच्या प्रवक्त्याने म्हटले, की नवे व्हॉट्सअपचे धोरण अपडेट नाही केले तरी वापरकर्त्यांचे अकाउंट १५ मे रोजीनंतर डिलीट होणार नाही. त्यामुळे धोरण (पॉलिसी) अपडेट न करणाऱ्या कोणत्याही भारतीयाचे अकाउंट बंद पडणार नाही. मात्र, आम्ही पुढील काही आठवडे लोकांना धोरण अपडेट करण्याची आठवण (रिमाईंडर) देत राहणार आहोत, असेही प्रवक्त्याने म्हटले आहे. बहुतांश वापरकर्त्यांनी नव्या अटी स्वीकरून व्हॉट्सअप धोरण अपडेट केले आहे. तर काही लोकांना धोरण अपडेट करण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, कोणत्या कारणांनी निर्णयात बदल केला, हे प्रवक्त्याने सांगितले नाही. तसेच व्हॉट्सअपचे नवीन धोरण स्वीकारणाऱ्या व्यक्तींची आकडेवारीही प्रवक्त्याने दिली नाही.
हेही वाचा-'व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट केलेल्या एखाद्या वादग्रस्त पोस्टसाठी ग्रुप ॲडमिन जबाबदार नाही'
काय आहे व्हॉट्सअपच्या अपडेटचा वादग्रस्त मुद्दा?
केंद्र सरकारने व्हॉट्सअपला गोपनीयतेचे धोरण मागे घेण्याची सूचना केल्यानंतर कंपनीने भूमिका स्पष्ट केली होती. प्रस्तावित गोपनीयेतच्या धोरणातून वापरकर्त्यांचा डाटा फेसबुकशी वापर करण्याबाबत कोणताही बदल होणार नाही. त्या मुद्द्याबाबत असलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी खुले असल्याचे कंपनीने म्हटले होते. व्हाट्सअपकडून डाटावर कशी प्रक्रिया केली जाते. डाटा कसा स्टोअर केला जातो, आदी बाबीबाबत धोरण बदलण्यात येत आहे. हे अपडेट ८ फेब्रुवारीपासून लागू होणार होते. मात्र, हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. फेसबुकच्या अटी मान्य केल्यानंतर हे अपडेट होणार आहे.
व्हॉट्सअपने गोपनीयतेच्या धोरणात बदल करण्याचे जाहीर केल्यावर भारतासह जगभरातून फेसबुक कंपनीवर टीका करण्यात आली होती. व्हॉट्सअपचा डाटा फेसबुकची मालकी असलेल्या इतर कंपन्यांकडे सामाई केला जाईल, अशी जगभरातील वापरकर्त्यांमध्ये भीती आहे. असे असले तरी व्हॉट्सअपवरील संदेश हे इन्ड-टू-इन्ड इन्क्रिप्टेड असल्याचे व्हॉट्सअपची मालकी असलेल्या फेसबुकने जाहीर केले होते.