मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने गुगल पे, पेटीएम आणि फोनपेला वापरकर्त्यांसाठी इंटरऑपरेबिलिटी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. आरबीआयने ही सुविधा केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या वापरकर्त्यांना ३१ मार्च २०२२ पर्यंत ही इंटरऑपरेबिलिटी सेवा देण्याचे निर्देशात नमूद केले आहे. इंटरऑपरेबिलिटी सेवा म्हणजे वापरकर्ते या सेवेचा वापर करून प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंटमधून (पीपीआय) दुसऱ्या कोणत्याही पीपीआय किंवा बँकेत पैसे पाठवू शकतात.
आरबीआयच्या परिपत्रकाप्रमाणे केवायसीची कागदपत्रे पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत इंटरऑपरेबिलिटीची सुविधा सर्व पीपीआयला देणे बंधनकारक असणार आहे.
काय होणार इंटरऑपरेबिलिटीचा फायदा?
जर तुम्ही पेटीएम वापरत असाल तर तुम्हाला फोनपेसारख्या कोणत्याही डिजीटल वॉलेटवर पैसे पाठविणे शक्य होणार आहे. ग्राहकांना वेगवेगळी अॅप वापरण्याची गरज भासणार नाही. सध्या पेटीएमवरून थेट पैसे फोनपे अथवा गुगलपेवर पाठविण्याची सुविधा नाही.
पारंपारिक बँक खाती आणि मोबाईल वॉलेट अथवा डिजीटल वॉलेटमधील अंतर कमी करण्यासाठी इंटरऑपरेबिलिटीची सुविधा सुरू करण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत. आरबीआयने मोबाईल वॉलेटमधील पैसे एटीएममधून काढण्याचीही परवानगी दिलेली आहे.
पीपीआय म्हणजे काय?
पीपीआय म्हणजे कार्ड अथवा वॉलेट ज्यावर ग्राहकाला रक्कम ठेवता येते. त्याचा वापर करून ग्राहक वस्तू खरेदी, सेवा, पैसे पाठविणे असे विविध आर्थिक व्यवहार करू शकतो. त्यांना मोबाईल वॉलेट अथवा डिजीटल वॉलेट असेही म्हटले जाते.