नवी दिल्ली – बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बँक व्यस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या 15 टक्के वेतनवाढीला मंजुरी दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रखडली होती.
बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेतनवाढीतील फरक 1 नोव्हेंबर 2017 पासून देण्यात येणार आहे. वेतनवाढीचा प्रश्न सुटल्याचे इंडियन बँक असोसिएशनने म्हटले आहे. कर्मचारी व अधकाऱ्यांचे वेतन आणि भत्ते 15 टक्क्यांनी वाढणार आहे. या निर्णयाची प्रत ईटीव्ही भारतला मिळाली आहे.
यापूर्वी बँक व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे 2012 मध्ये वेतन वाढविले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2017 मध्ये वेतनवाढ अपेक्षित होती. दर पाच वर्षांनी बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळते. कामगिरीवर आधारित सर्व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम मिळावी, अशी अपेक्षा इंडियन बँक असोसिएशनने केली आहे. नॅशनल पेन्शन स्कीममध्ये देण्यात येणारे योगदान 10 टक्क्यांवरून 14 टक्के करण्यालाही बँक व्यवस्थापनाने मंजुरी दिली आहे.