नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे देशात काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ झालेली नव्हती. मात्र आज सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 60 पैशांची वाढ केली.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर लोकांचे जीवन थोड्याप्रमाणात रुळावर येत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या मागणीत वाढ होत आहे. त्याच वेळी, क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 40 डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत प्रति लिटर 60-60 पैशांची वाढ करण्यात आली.
दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोलचे आणि डिझेलचे दर 60 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 72.46 रुपये आणि 70.59 रुपये मोजावे लागतील. तसेच मुंबईकरांनाही आज एक लिटर पेट्रोलसाठी 79.49 रुपये तर डिझेलसाठी 69.37 रुपये मोजावे लागतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील चढ-उतारांना राज्य सरकार जबाबदार आहे. राज्यांचा महसूल वाढवण्यासाठी व्हॅट किंवा सेसमध्ये वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ नोंदवली आहे. येत्या काही दिवसात कोरोनासह महागाईचा चटका सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.