नवी दिल्ली - भविष्य निर्वाह निधी खाते असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भविष्य निर्वाह निधी संस्था (ईपीएफओ) खातेदारांच्या बँक खात्यावर भविष्य निर्वाह निधीचे ८.५ टक्के व्याज जमा करणार आहे.
ईपीएफओच्या विश्वस्तांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांना वर्ष २०१९-२० साठी ८.१५ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उर्वरित ०.३५ टक्के व्याज हे चालू वर्षात डिसेंबरमध्ये देण्यात येणार आहे.
ईपीएफओ यापूर्वी ८.५ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याची अद्याप सूचना काढण्यात आली नाही. मात्र बाजारातील अस्थिरता आणि टाळेबंदीने हा निर्णय घेण्यात आला नाही.
ईपीएफओची सर्वोच्च संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (सीबीटी) ही डिसेंबरमध्ये बैठक घेणार आहे. त्यामध्ये उर्वरित ०.३५ टक्के व्याजावर निर्णय घेण्यात येणार आहे. अद्याप हा विषय डिसेंबरमधील बैठकीच्या अजेंड्यावर घेण्यात आला नाही. मात्र, काही विश्वस्तांनी ईपीएफओच्या खातेदारांना व्याज देण्यात उशीर होत असल्याचा प्रश्न बैठकीत उपस्थित केला आहे.
बोर्डाचे अध्यक्ष केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी वर्ष २०१९-२० साठी ईपीएफओच्या खातेदारांना ८.५ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सूत्राच्या माहितीनुसार वित्त मंत्रालयाने यापूर्वीच मागील आर्थिक वर्षासाठी ८.५ टक्के व्याज देण्याला संमती दिली आहे.