नवी दिल्ली - जीएसटी परिषदेने इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी ७ टक्क्याने कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्च्युअर्रस ऑफ इलेक्ट्रिक व्हिक्लस (एसएमईव्ही) या वाहन उत्पादक संघटनेने स्वागत केले आहे. जीएसटी कपातीचा निर्णय हा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणारा असल्याचे एसएमईव्हीने म्हटले आहे.
एसएमईव्हीचे संचालक सोहिंदर सिंग गिल म्हणाले, जीएसटीच्या कपात केल्याने कंबसशन इंजिनचे वाहन आणि इलेक्ट्रिक वाहनाच्या किमतीमधील फरक कमी होणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वेगाने अवलंब होणे शक्य होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सरकार इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी निर्णय घेत आहे. त्याचप्रमाणे जीएसटी कपातीचा निर्णय घेतला आहे. जीएसटी कपात हा राष्ट्रीय इलेक्ट्रिक धोरणातील महत्त्वाचा भाग ठरणार आहे. बॅटरीच्या सुट्ट्या भागावर असलेल्या १८ टक्के जीएसटीतही कपात करण्यात यावी, अशी इलेक्ट्रिक वाहन उद्योगाची अपेक्षा आहे. ही कपात केल्यास इलेक्ट्रिक वाहनांची कायमस्वरुपी किंमत कमी होणार आहे.