अहमदाबाद- टेस्लाचा प्रकल्प राज्यांत आणण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये स्पर्धा लागली आहेत. अशातच टेस्ला ही जगातील सर्वात मोठा प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करेल, असा विश्वास गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री नितीन पटेल म्हणाले की, अनेक कंपन्या कोरोनाच्या संकटात बंद पडल्या आहेत. चीनमधील बंद पडलेल्या कंपन्या भारतामध्ये प्रकल्प सुरू करत आहेत. विशेषत: गुजरातमध्ये विविध कंपन्या सुरू होत असल्याची माहिती गुजरातचे उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
टेस्ला ही जगातील उत्कृष्ट इलेक्ट्रिक कार कंपनी आहे. गुजरातमध्ये टेस्लाने प्रकल्प सुरू करण्यासाठी टेस्लाचे अधिकारी व राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. टेस्लाला सर्व शक्य तेवढी मदत आणि सवलत गुजरात देणार आहे. टेस्ला बंगळुरूमध्ये संशोधन आणि विकास प्रकल्प सुरू करणार आहे. त्याचबरोबर गुजरातसह इतर राज्यांमध्ये प्रकल्प सुरू करण्यासाठी टेस्ला कंपनी चर्चा करत आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी गुजरात सरकारकडून रेड कार्पेट अंथरण्यात आले आहे. नव्या कंपन्यांमुळे सरकारचा महसूल वाढणार आहे. तसेच रोजगार वाढण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या गुजरातमध्ये सुरू झाल्याने गुजरात आणि गुजरातींचा फायदा होणार आहे.
हेही वाचा-ठरलं! टेस्लाचे बंगळुरूमध्ये सुरू होणार कार्यालय
टेस्लाचे बंगळुरूमध्ये कार्यालय सुरू-
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी जाहीर केल्याप्रमाणे टेस्लाने अखेर भारतात प्रवेश केला आहे. टेस्लाकडून टेस्ला इंडिया मोटार्स आणि इनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची देशात नोंदणी झाली आहे. नुकतेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्ला कारच्या वितरणाची पूर्ण यंत्रणा २०२१ मध्ये भारतात असणार असल्याचे म्हटले होते. तसेच जगामधील सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादक देश होण्याची भारतामध्ये क्षमता आहे, असा विश्वास व्यक्त केला होता.