नवी दिल्ली - ई-कॉमर्स म्हणजे रिटेल क्षेत्रातील क्रांती असल्याचे मत नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी व्यक्त केले. ते व्यापारी महासंघाच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांनी ई-कॉमर्स कंपन्यांमुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याची भूमिका मांडली.
ई-कॉमर्स क्षेत्रामुळे जीडीपीत वाढ होत असून रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे अमिताभ कांत यांनी म्हटले आहे. व्यवसायासाठी डिजीटल पद्धतीचा वापर करावा, असा सल्ला त्यांनी व्यापाऱ्यांना दिला. ग्राहकांच्या खरेदीच्या सवयी जरी बदलत असल्या तरी जुनी किरकोळ बाजारपेठ आणि आधुनिक किरकोळ बाजारपेठ दोन्ही अस्तित्वात राहणार असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना मोठ्या सवलती देत असल्याने व्यवसायावर परिणाम होत आहे, अशी चिंता खंडलेवाल यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने ई-कॉमर्स क्षेत्रासाठी नियामक संस्था उभारावी, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. वस्तू घरपोहोच करताच पैसे देण्याच्या पद्धतीवर (कॅश ऑन डिलिव्हिरी) बंदी यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
केंद्र सरकारने बदलले ई-कॉमर्स कंपन्यांचे नियम-
एफडीआयच्या नव्या धोरणानुसार ऑनलाईन रिटेल कंपन्यांना छोट्या उद्योगांना विक्रीसाठी समान संधी द्यावी लागणार आहे. तसेच ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांची उत्पादने ऑनलाईन विकता येणार नाहीत. यापूर्वी ऑनलाईन कंपन्या नियमांचे उल्लंघन करून बाजारपेठेत वर्चस्व निर्माण करत असल्याची तक्रार व्यापारी संघटनांनी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे केली होती.