नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली तरीही दुकानदारांनी घाई करू नये, असे अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) आवाहन केले आहे. दुकाने सुरू करण्यासाठी राज्यांच्या सूचनेची वाट पाहा, असे सीएआयटीने दुकानदारांना सांगितले आहे.
दुकाने आणि बाजाराची जागा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सॅनिटायझरने स्वच्छ करा, असे सीएआयटीचे महासचिव प्रविण खंडेलवाल यांनी दुकानदारांना आवाहन केले. ते म्हणाले, की केंद्र सरकारने सध्याची परिस्थिती पूर्ण जाणून निर्णय घेतला आहे.
दुकानदारांनी अतिउत्साहात दुकाने उघडू नयेत. सरकारच्या आदेशाची वाट पाहा. त्यांच्या आदेशानंतरच दुकाने उघडता येतात. व्यापार, दुकाने आणि आस्थापना हा राज्यांचा विषय आहे. तर राज्य सरकारच हा निर्णय सक्षमतेने घेवू शकतात, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
हेही वाचा-टाळेबंदी शिथील : मॉल वगळता दुकाने सुरू करण्याची गृहमंत्रालयाची परवानगी
सीएआयटीचे देशभरात सात कोटी सदस्य आहेत. दुकाने सुरू करण्यापूर्वी सरकारने तातडीने व पूर्ण नियोजन करण्याची आवश्यकता आहे. सर्व राज्यांनी दुकाने व बाजाराचे सॅनिटायझेशन करण्यासाठी पावले टाकण्याची गरज असल्याचे खंडलेवाल यांनी सांगितले. दुकान आणि बाजार एक महिन्यांच्या कालावधीहून अधिक काळ बंद आहे. त्यामुळे दुकानात कोरोनासारखे अनेक विषाणू, धूळ आणि घाण असू शकते, असे सीएआयटीने म्हटले आहे.
हेही वाचा-दिलासादायक! आयआयटी दिल्लीकडून कोरोना चाचणीचे किट विकसित
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने २५ मार्चपासून टाळेबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे देशातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.