सतना (मध्यप्रदेश) - धनत्रयोदशी हा शुभ मुहुर्त समजला जात असल्याने ग्राहकांकडून नव्या वाहनाची आवर्जून खरेदी होते. मध्यप्रदेशमधील एका ग्राहकाने होंडा अॅक्टिवाची खरेदी करण्यासाठी चक्क पोतेभरून नाणी आणली. हे नाणी मोजताना शोरुममधील कामगारांची चांगली दमछाक झाली.
राकेश गुप्ता हे होंडा अॅक्टिव्हा खरेदी करण्यासाठी ८३ हजार रुपये चार पोत्यात घेवून कृष्णा होंडा शोरुममध्ये पोहोचेले. त्यांच्याजवळ हे सर्व पैसे दहा आणि पाच रुपयांच्या नाण्यामध्ये होते. हे पैसे मोजण्याचे काम तीन कामगारांना देण्यात आले.
हेही वाचा-अभिनेत्री मौनी रॉयच्या हस्ते शेअर मार्केटमध्ये लक्ष्मीपूजन
शोरुमचे व्यवस्थापक अनुपम मिश्रा म्हणाले, धनत्रयोदशीला गुप्ता हे आमच्या शोरुममध्ये आले होते. त्यांनी होंडा अॅक्टिव्हा १२५ बीएस ४ खरेदी करण्याची इच्छा दर्शविली. त्याबाबत शोरुमचे मालक आशिष पुरी यांच्याशी चर्चा केली. नाणी मोजण्यासाठी वेळ लागेल, असे त्यांनी सांगितले. धनत्रयोदशीला कोणत्याही ग्राहकांना नाराज करणे योग्य वाटत नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करायचे ठरविले.
स्वत: शोरुम मालक पुरी यांनी तीन कामगारांबरोबर पैसे मोजले. त्यासाठी चार तास लागले. हा दिवस ग्राहक, आमच्यासाठी व शोरुमच्या मालकांसाठी खास होता, असेही मिश्रा यांनी सांगितले. नुकतेच होंडा मोटारसायकलने नवीन १२५ अॅक्टिव्हा लाँच केली. हे वाहन नवीन बीएस-६ मानकाप्रमाणे आहे. या वाहनाची एक्स शोरुमसाठी ७४ हजार ९९० रुपये किंमत आहे.