इंफाळ - कोरोना विषाणूजन्य रोगाचा चीनसह शेजारील म्यानमार देशात शिरकाव झाल्याने मणिपूरने उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. मणिपूर सरकारने चीन आणि इतर देशांमधून हवाबंद पॅकिंगमधून अन्न पदार्थ आयात करण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी एफएसएसआयच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या अन्नपदार्थावर असल्याचे मणिपूर सरकारने म्हटले आहे.
कोणताही व्यक्ती पॅकिंग केलेले अन्नपदार्थ चीन, म्यानमार आणि दक्षिण आशियामधून मागवू शकणार नाही, अशी अधिसूचना मणिपूर राज्याचे अतिरिक्त अन्नसुरक्षा आयुक्त के. राजो सिंह यांनी काढली आहे. ज्या पॅकिंगमध्ये कोणतेही लेबलिंग अथवा मार्किंग नाही, अशा पॅकिंगची विक्री, वितरण आणि उत्पादन करता येणार नाही. नागरिकांनी खबरदारी म्हणून चीन, म्यानमार आणि दक्षिण आशियातील देशांमधून आयात केलेले अन्नपदार्थ खाऊ नये, अशीही सरकारने विनंती केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर जप्ती आणि तपासणी करून कार्यवाही करण्याचे आदेश मणिपूरच्या आरोग्य संचलनालयाने दिले आहेत. या आदेशाचे गांभीर्याने पालन करण्याचे आदेशही दिले आहेत.
हेही वाचा - प्राप्तिकर कायद्याचे फौजदारी स्वरूप काढण्याची इच्छा - निर्मला सीतारामन
मणिपूरची म्यानमार देशालगत ३९८ किमीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. भारताचा पूर्वेकडील देशांबरोबर मणिपूरमधून व्यापार होतो. चीन, थायलंड आणि सिंगापूरमधून मणिपूरमध्ये आलेल्या १७२ लोकांना त्यांच्या निवासस्थानी देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त संचालक (सार्वजनिक आरोग्य) ए. आर्के यांनी दिली.