नवी दिल्ली - रक्षाबंधन हा उत्तर भारतामधील सर्वात मोठ्या सणापैकी एक सण आहे. येत्या तीन दिवसावर रक्षाबंधन आले असताना राखीची विक्री होत नसल्याने विक्रेत्यांना आर्थिक फटका बसत आहे.
रक्षाबंधनानिमित्त भाऊ बहिणीला आवर्जून भेटायला जात असतात. मात्र, कोरोनामुळे सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात कुटुंबातील लोक एकत्रित येणे व कार्यक्रम साजरे करणे जवळपास बंद झाले आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये 42 वर्षांच्या राजबाला या महिला राखी विक्रेत्याला दिवसभरात एकही विक्री करणे शक्य झाले नाही. कोणालाही राखी खरेदी करण्याची इच्छा नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ऑनलाइन रक्षाबंधन साजरा करण्यात येत आहे. मात्र, त्यामध्ये नेहमीचा उत्साह दिसत नाही. रक्षाबंधनाच्या सणामधून उत्पन्न मिळिवण्याचे राजबालासारख्या अनेक विक्रेते आणि लघू उद्योगांचे स्वप्न भंगले आहे. यापूर्वी महिला सायंकाळी दुकानात येवून राखीची खरेदी करत होत्या. मात्र, कोरोना महामारीमुळे सर्व व्यवसाय बुडाल्याचे राजबाला यांनी सांगितले. राजबाला गेल्या 15 वर्षांपासून राखी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे ग्राहक दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी जाण्याचे टाळत आहेत.
गाझियाबादमधील गृहिणी छाया सिंह यांनी रक्षाबंधनासाठी ऑनलाइन खरेदीही करणार नसल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, की भावापर्यंत राखी पोहोचेपर्यंत किती जणांनी राखीला हात लावला असेल, हे कुणाला माहित? त्यामुळे ऑनलाइन राखी करणे सुरक्षित आहे, असे वाटत नाही. पेप्पा या कंपनीला दरवर्षी बियांचा समावेश असलेल्या 15 हजार राख्यांची ऑर्डर मिळते. यंदा 5 हजारांहून कमी राख्यांची ऑर्डर मिळाली आहे.
दरम्यान, शुक्रवारी देशातील कोरोनाबाधितांची संख्या 16 लाखांहून अधिक झाली आहे, तर एका दिवसात 55 हजार 78 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर मृतांचा आकडा हा 35 हजार 747 झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.