नवी दिल्ली - यंदा सरासरीहून कमी मान्सून होणार असल्याने पीक उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कांदा व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी सरकार गुप्तचर यंत्रणेसह पोलिसांची मदत घेणार आहे. याशिवाय भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचा कमीत कमी ५० हजार टन साठा करण्याची सूचना नाफेडला केली आहे.
केंद्रीय अन्न मंत्रालयाने नाफेडला गुजरातसह महाराष्ट्रातून कांदा खरेदी सुरू करण्याची सूचना केली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले, अधिकाधिक कांदा खरेदी करण्याच्या सूचना नाफेडला देण्यात आल्या आहेत. साठेबाजीवर आळा घालण्यासाठी सरकार गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांची मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढू नये, यासाठी सरकार उपाय योजना करत आहे. विविध उपाय योजनांमुळे कांद्याच्या बाजारातील किमती नियंत्रणात राहतील, अशी सरकारला अपेक्षा आहे.
कृषीमंत्रालयाच्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात १२.६७ लाख हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. गतवर्षी १२.८५ लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली होती.
२०१७ मध्ये कांद्यासह पालेभाज्यांची झाली होती भाववाढ-
राजधानीत २०१७ मध्ये पालेभाज्यांच्या किमती प्रति किलो ६० किलोपर्यंत वाढल्या होत्या. कांद्याच्या किमती नियंत्रणात करणे शक्य नसल्याचे त्यावेळी केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान म्हणाले होते. कांद्याची कमी लागवड आणि व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळे कांद्याचे भाव वाढल्याचे पासवान यांनी म्हटले होते. त्यामुळे सरकारला स्थानिक बाजारातून कांद्याची खरेदी करावी लागली होती. तर निर्यातवाढीवर बंधने आणावी लागली होती.