नवी दिल्ली - गुगल कंपनीला देशात अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने गुगल पे ने केलेल्या अनुचित व्यापारप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
गुगल पे हे गुगल कंपनीचे डिजीटल देयक माध्यम आहे. भारतीय स्पर्धा आयोगाच्या (सीसीआय) महासंचालकाने गुगल पे ने केलेल्या अनुचित व्यापाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. स्पर्धा कायदा कलम ४ अन्वये कंपन्यांना बाजारात वर्चस्व करण्याला प्रतिबंध आहे. या नियमांचे गुगलने उल्लंघन केल्याचा आरोप आहे. गुगलने गुगल पे ला लाभ मिळवून देण्यासाठी स्पर्धक अॅपला भेदभावाची वागणूक दिल्याचा भारतीय स्पर्धा आयोगाने आरोप केला आहे. सीसीआयकडून अल्फाबेट, गुगल एलएलसी, गुगल आयलर्डं, गुगल इंडिया आणि गुगल इंडिया डिजीटल सर्व्हिसेसची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
गुगल आणि पेटीएममध्ये झाला होता वाद-
पेटीएम अॅप हे गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले होते. पेटीएम हे वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या मालकीचे अॅप आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून काढल्याचे गुगलने म्हटले होते. तसेच खेळांमध्ये जुगारांना प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याच अॅपचे गुगल समर्थन करत नाही. अशा सर्वंच अॅप्सना गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात येईल, असे गुगलने म्हटले होते. त्यानंतर पेटीएमने स्वतंत्र मिनी अॅप स्टोअर सुरू केले आहे.
सीसीआय काय काम करते?
उचित व्यापारासाठी नियमन भारतीय स्पर्धा आयोग (सीसीआय) काम करते. यापूर्वी सीसीआयने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ई-कॉमर्स कंपन्यांचीही चौकशी केली होती.