नागपूर - भविष्य निर्वाह निधी कार्यालयातीलवरिष्ठ अधिकारी लाचखोरी प्रकरणात सीबीआयच्या जाळ्यात अडकला आहे. ए.बी. पहाडे असे ५० हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचखोर अधिकारी ए.बी.पहाडे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
वेगवेगळ्या उर्जा उद्योगाला मनुष्यबळाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने सीबीआयकडे तक्रार केली होती. तक्रारदार हा कामगारांचा भविष्य निर्वाह निधी वेळेवर नागपूरच्या कार्यालयात भरत होता. पहाडे याने गेल्या ५ वर्षाचे रेकॉर्ड पाहण्यासाठी तक्रारदाराला कार्यालयात बोलाविले. त्यानंतर भविष्य निर्वाह निधीचे लेखापरीक्षण कोणताही अडथळा न आणता पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे ३ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली.
कंत्राटदाराने लाच देण्याचे नाकारताच अधिकाऱ्याने तडजोड करत ३ लाख रुपये स्विकारण्याचे कबूल केले. यानंतर कंत्राटदाराने सीबीआयकडे तक्रार करताच सीबीआयने सापळा रचला. पहिला हप्ता कंत्राटदाराकडून घेताना अधिकाऱ्याला सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पुरावे गोळा करण्यासाठी लाचखोर अधिकाऱ्याचे कार्यालय आणि घराची झडती घेतली.