नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि हरियाणाच्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांच्या एकूण खर्चापैकी एकट्या भाजपने ६० टक्के खर्च केला होता. ही माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने (एडीआर) अहवालात दिली आहे.
एडीआरच्या अहवालानुसार महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांचा एकूण खर्च हा ३६२.८७ कोटी रुपये होता.
भाजपने २०१४ विधानसभा निवडणुकीत २२६.८२ कोटी खर्चून सर्वात अधिक पैसे खर्च केले. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसने ६३.३१ कोटी रुपये महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुकीत खर्च केले.
मागील विधासनसभा निवडणुकीत भाजप पक्षनिधी मिळविण्यातही आघाडीवर
भाजपने सर्वात अधिक पक्षनिधी म्हणून २९६.७४ कोटी रुपये मिळविले. भाजपला मिळालेल्या एकूण पक्षनिधीपैकी ५८.६९ टक्के म्हणजे १७४.१५९ कोटी रुपयांचा पक्षनिधी भाजप मुख्यालयाला मिळाला. तर महाराष्ट्र भाजपला १२२.२८ कोटी रुपये, तर हरियाणा भाजपला ०.३०३ कोटी रुपये पक्षनिधी म्हणून मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे. काँग्रेस ८४.३७ कोटींचा पक्षनिधी मिळवित निधी गोळा करणारा दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष ठरला होता.