नवी दिल्ली - चालू वर्षात वाहन विक्रीत १८.७१ टक्के घट झाली आहे. त्याचा फटका बसल्याने गेल्या १९ वर्षातील विक्रीचा निचांक वाहन उद्योग क्षेत्र अनुभवत आहे. मंदी असल्याने गेल्या दोन-तीन महिन्यात सुमारे १५ हजार हंगामी कर्मचाऱ्यांना हातची नोकरी गमवावी लागल्याचे एसआयएएमने म्हटले आहे.
वाहन उद्योगाची संघटना एसआयएएमचे महासंचालक विष्णू माथूर यांनी वाहन विक्रीचे प्रमाण कमी झाल्याची आकडेवारी दिली आहे. ते म्हणाले, या आकडेवारीवरून उद्योगाला पुनरुज्जीवनासाठी पॅकेजची किती नितांत गरज आहे, हे दिसून येत आहे. वाहनांची विक्री वाढविण्यासाठी उद्योगाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. उद्योगाला सरकारने मदत करण्याची ही योग्य वेळ आहे. वाहनांची विक्री वाढविणे व उद्योगाचा वृद्धीदर वाढविण्यासाठी सरकारने पॅकेज जाहीर करावे, अशी त्यांनी मागणी केली.
वाहन उत्पादन प्रकल्पामधील सुमारे १५ हजार हंगामी कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमविल्या आहेत. तर दुसरीकडे वाहनांचे सुट्टे भाग तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये १० लाख नोकऱ्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विक्री घटल्याने सुमारे ३०० डीलरशीपचे व्यवसाय बंद झाले आहेत. त्यातून सुमारे २ लाख नोकऱ्या गमविल्याचेही माथूर यांनी सांगितले. वाहन उद्योगामध्ये २००८-२००९ आणि २०१३-१४ कालावधीत मंदी असतानाही काही प्रकारच्या वाहनांची विक्री होती. मात्र सध्या सर्व प्रकारच्या वाहनांची विक्री कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. वाहन उद्योगाची प्रगती खालावली तर जीडीपीही कमी होईल, असेही ते म्हणाले.