सातारा- रविवारच्या तुलनेत सोमवारी कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण प्रतिसेकंद सरासरी 17 हजार 752 क्युसेक्स इतके झाले असून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सिंचनासाठी धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2 हजार 111 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झाली असून सध्या धरणातील उपलब्ध पाणीसाठा 34.37 टी.एम.सी. इतका झाला आहे.
रविवारी कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी दमदार पाऊस पडला. परंतु त्या तुलनेत सोमवारी पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर मंदावला. तथापी झालेल्या पावसामुळे धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर आदी परिसरातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या मोठ्या प्रमाणात धरणात पाण्याची आवक होत आहे. सध्या येथे प्रतिसेकंद सरासरी 17 हजार 752 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. त्याचवेळी धरण पायथा वीजगृहातील 2 जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सिंचनासाठी 2 हजार 111 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. धरणाची सध्याची स्थिती पहाता येथे एकूण उपलब्ध पाणीसाठा 34.37 टी.एम.सी. पैकी उपयुक्त साठा 29.37 टी.एम.सी पाणी उंची 2 हजार 84.5 फूट, जलपातळी 635.33 मीटर इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासातील व एक जूनपासून आजपर्यंतचा एकूण पाऊस पुढीलप्रमाणे
कोयना 63 मिलीमीटर ( 1010 ), नवजा 26 मिलीमीटर ( 1073 ) , महाबळेश्वर 66 मिलीमीटर ( 1016 ) पावसाची नोंद झाली आहे.