श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या विविध खेड्यांमधील नागरिकांनी पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून वारंवार गोळीबार होत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. तेथील नागरिकांना त्यांच्या कुटुंबाची काळजी वाटत आहे.
सतत झालेल्या गोळीबारामुळे घरे आणि शेतीतील पिके नष्ट झाल्याने भारतीय बाजूस मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोफ गोळ्यांमुळे (मोर्टल शेल्स) मोठी हानी होत असून निर्दोष लोकांच्या जीवितास त्यामुळे धोका निर्माण झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
तिकडून नेहमीच खेड्यांना लक्ष्य केले जाते. सकाळ, संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळीही गोळीबार केला जातो. छतावर आणि शेतांसह इतर ठिकाणी गोळ्या येवून पडतात, असे एका गावकऱ्याने सांगितले. आमच्या गावातून शेजारच्या गावांना जोडणारा एकमेव रस्ता आहे, त्या रस्त्यावर अनेक मोर्टल्स पडले आहेत. आम्ही लष्काराला विनंती करतो की, त्यांनी मोर्टल्स काढून रस्ता मोकळा करावा. नागरिकांना तेथून जाताना काळजी वाटत असल्याचे त्यांचे म्हणने आहे.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी सैन्याने बारामुल्ला जिल्ह्यातील सिलिकोट, चरुंडा आणि तिलवारी भागात गोळीबार केला होता. उरी सेक्टरमधील नववा गावात नुकत्याच झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर सापडलेल्या अनेक मोर्टार शेलांना भारतीय लष्कराच्या बॉम्बशोध पथकाने आज नष्ट केले.