नाशिक - शहर व जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. तब्बल 12 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळणार आहे. रात्रीच्या पावसामुळे त्र्यंबकेश्वरमधील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पातळीत देखील वाढ झाली आहे.
दिंडोरी, कळवण, बागलाण, मनमाड, येवला, निफाड, नांदगाव आणि मालेगाव त्र्यंबकेश्वर, ईगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या तालुक्यांना सायंकाळी आणि रात्री पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. येवल्याच्या राजापूरसह इतर काही भागात तर मुसळधार पावसामुळे शेतात पाणी तुंबले, तर नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. सलग पाऊस होत असल्याने तळ गाठलेल्या विहिरींनादेखील पाणी उतरू लागले, त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
पिंपळगाव शहरात व परिसरातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांसह आंबा, मका, सोयाबीन, टॉमेटो आदी फळ पिकांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा अडचणीत सापडला आहे.
पिंपळगाव परिसरातील उंबरखेड, मुखेड, बेहड, कोकणगाव येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली होती. दुपारपर्यंत कडक ऊन होते. सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल झाला होता. शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले व थंड वारे वाहू लागले होते. सायंकाळी चारच्या सुमारास दीड तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामात पेरलेली बियाणे पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेल्याने बळीराजा पुन्हा अडचणीत सापडला आहे.
टॉमेटो रोपांचे अधिक नुकसान
दोन ते दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या टोमॅटो पिकासाठी रोप लागवड केलेली आहे. परंतु काल दीड तास जोरदार पाऊस झाल्याने पेरलेल्या रोपांचे अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा टोमॅटो रोपाची लागवड करावी लागेल.