रायगड - विलासराव देशमुख, प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री असताना आपल्या भागात प्रकल्प आणले मात्र अनंत गीते यांनी अवजड उद्योगमंत्री असूनही राज्यात, कोकणात किंवा जिल्ह्यात कुठे प्रकल्प उभा केलात याचे उत्तर आधी द्या. असा प्रश्न आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी विचारला. तर नरेंद्र मोदी हे पूर्ण देश फिरून आले आहेत. म्हणजे मोदी देशात कमी आणि परदेशात जास्त असे अनंत गीते यांना सुचवायचे होते असा खोचक टोलाही तटकरे यांनी लगावला आहे.
अलिबाग खडताल पूल येथील कोको मँगो येथे आघाडीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात अनंत गीते यांच्यावर टीका केली. यावेळी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, राजीप उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील, नृपाल पाटील, चित्रा पाटील, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाषणात तटकरे म्हणाले, की अनंत गीते हे सलग सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले. दहा वर्षे रायगडचे नेतृत्व ते करत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री, ऊर्जामंत्री ही पदे भूषवली आहेत. तर नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग खात्याचे मंत्री म्हणून काम करीत आहेत. या खात्यात लाखोची उलाढाल होत आहे. अवजड उद्योग खात्यामार्फत जेवढे काम देशात करता येणार होते ते सुद्धा अनंत गीते याना करता आले नाही. हेच अवजड उद्योग खात्याचा कारभार विलासराव देशमुख, प्रफुल्ल पटेल यांनी सांभाळला होता. त्यावेळी विलासराव देशमुख यांनी लातूर तर प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया येथे प्रकल्प आणला.
अनंत गीते यांच्याकडे अवजड खाते असूनही त्यांना एकही प्रकल्प उभा करता आलेला नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्ण जग फिरले आहेत. मात्र ते देशात फिरले नाहीत असे अनंत गीते याना सुचवायचे होते काय असा खोचक टोलाही सुनील तटकरे यांनी गीते यांना मारला आहे.