मुंबई - आता राज्यात रिक्षांची वयोमर्यादा १५ वर्षे करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. मुंबई एमएमआर परिसरात रिक्षांची वयोमर्यादा २० वर्षांवरून १५ वर्षांवर आणण्यात आली असून इतर भागांमध्ये ती टॅक्सींप्रमाणे करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. २४ सप्टेंबरला पार पडलेल्या बैठकी दरम्यान या निर्णयाला मंजूरी देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
माजी आयएएस अधिकारी बी.सी. खटुभा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसींच्या आधारावर राज्य परिवहन प्राधिकरणाने हा निर्णय घेतला. २०१७ मध्ये खटुआ समितीनं महाराष्ट्र सरकारला यासंदर्भातील अहवाल सोपवला होता. त्यापैकी रिक्षांची वयोमर्यादा कमी करण्यासह अनेक महत्त्वाच्या शिफारसी स्वीकारण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्य परिवहन विभागाने रिक्षांबाबत हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी राज्यात रिक्षांची वयोमर्यादा २० वर्षे इतकी होती. मात्र आता नव्या निर्णयानुसार १ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई एमएमआर परिसरात १५ वर्षांपेक्षा जुन्या रिक्षा चालवण्यास बंदी असेल. तर उर्वरित महाराष्ट्रात १ ऑगस्ट२०२४ पासून हा निर्णय लागू होणार आहे. २०१३ पूर्वी राज्यात टॅक्सींसाठी वयोमर्यादेचं बंधन घालण्यात आले असले तरी रिक्षांसाठी मात्र बंधन नहते. राज्यात सध्या १० लाखांपेक्षा अधिक रिक्षा रस्त्यांवर धावत आहेत. यापूर्वी हकीम समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारावर १ ऑगस्ट २०१३ पासून राज्य परिवहन प्राधिकरणानं रिक्षा आणि टॅक्सींची वयोमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती अधिका-यांनी दिली. त्यापूर्वी राज्यात रिक्षांसाठी कोणत्याही वयोमर्यादेचं बंधन नव्हतं. तर दुसरीकडे राज्य परिवहन प्राधिकरणानं राज्यातील टॅक्सींना २५ वर्षांच्या वयोमर्यादचं बंधन घातले होते.