मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी दिलासा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीचा मोफत प्रवास 3 जुलैपासून बंद करण्याचे परिपत्रक एसटीच्या वाहतूक विभागाच्या व्यवस्थापनाने आज काढले होते. मात्र काही तासातच हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर आली.
मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली एसटीची मोफत सेवा बंद करण्यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे. त्या पत्रावरून एसटी महामंडळाने 3 जुलैपासून एसटीतून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवतील कर्मचाऱ्यांकडून प्रवासी भाडे घेण्याचे आदेश मुंबई, पालघर, ठाणे विभाग नियंत्रकांना दिले होते. काही तासातच हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की एसटीच्या अधिकाऱ्यांवर आली आणि त्यांनी ते परिपत्रक रद्द करत एसटीचा प्रवास अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोफत असणार असल्याचे जाहीर केले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेकडून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळाला पैसे देण्याचे मंजूर झाले आहे. ते पैसे पालिकेकडून येणे बाकी होते. मात्र आता ते पैसे एसटी महामंडळाच्या खात्यात जमा होणार असल्याने 12 ऑगस्टपर्यंत लोकल सेवा नियमित होईपर्यंत एसटीचा मोफत प्रवास अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र याबाबत एसटीचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांना विचारले असता, त्यांना याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले.