वाशिम - उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक अत्याचार प्रकरणी शिवसेनेच्या वतीने राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहे. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात आज वाशिममधील पाटणी चौकात आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शहरातील पाटणी चौकातून शिवसेनेच्या या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी काढलेल्या मोर्चात शिवसेनेच्या शेकडो महिला पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना अतिशय निंदनीय असल्याचे मत व्यक्त करत शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच यावेळी आंदोलनकर्त्यांनी योगी सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही केली. पीडितेला व तिच्या कुटुंबीयांना लवकरात न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.