मुंबई - मध्य रेल्वेचे वैद्यकीय पथक कोरोनाच्या या लढाईत युद्धपातळीवर काम करत आहे. यातच आता तंत्रज्ञानाची मदतही घेतली जात आहे. सोलापूरच्या विभागीय रेल्वे रुग्णालयात वैद्यकीय मदतीसाठी वैद्यकीय सहाय्यक म्हणून रोबोटचा वापर करण्यात येत आहे.
सोलापूरच्या कोटणीस मेमोरियल रेल्वे हॉस्पिटल येथील कार्यरत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी एक अभिनव वैद्यकीय सहाय्यक म्हणजेच रोबोट (आरओ) बनविण्यात आला आहे. हा रोबोट तापमान, ऑक्सिजन तपासणी दूरस्थपणे मोजण्यासाठी आणि रूग्ण व डॉक्टरांशी द्वि-मार्ग व्हिडिओ संप्रेषणाद्वारे स्वयंचलितपणे सॅनिटायझर वितरणासाठी वापरला जातो. रिमोट ऑपरेशनद्वारे त्यांना अन्न, औषधे पुरवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, पुणे आणि सोलापूर विभागातील रूग्णांच्या देखरेखीसाठी डॉक्टर आणि पॅरा-मेडिकल स्टाफची गरज भासत आहे. यासाठीच वैद्यकीय विभागाने वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि इतर तंत्रज्ञांची कराराच्या आधारावर नेमणूक केली आहे. जेणेकरुन या महत्त्वपूर्ण काळात मध्य रेल्वेच्या कोणत्याही विभागात डॉक्टर आणि पॅरामेडीकल कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये. आता यात रोबोटची भर पडल्याने कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.