सांगली - दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेने सांगलीच्या इस्लामपूरमध्ये केलेल्या आंदोलनादरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी पोलिसांना माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाला ताब्यात घेतले.
दुधाला दर मिळावा, या मागणीसाठी महायुतीच्या माध्यमातून आज राज्यभर आंदोलन पुकारले होते. त्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेच्या वतीने इस्लामपूरमध्ये आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती संघटनेचे युवा नेते सागर खोत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी पेठ-सांगली रस्त्यावर रयत क्रांती संघटनेतर्फे भजन आंदोलन करण्यात आले. दुधाची वाहतूक करणारी गाडी अडवून दूध रस्त्यावर फेकले. दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आणि या आंदोलनावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.