नवी मुंबई- कोरोनाची लागण झाली किंवा नाही याची जलद तपासणी करण्यासाठी आता पनवेल महापालिका प्रशासनाने खारघरमधील नागरी आरोग्य केंद्रात अँटिजेन टेस्टची सुरुवात केली आहे. तीस मिनिटात या चाचणीचा अहवाल प्राप्त होत असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
खारघरच्या नागरिकांना कोरोना चाचणीसाठी बाहेर जावे लागत होते. त्यामुळे ही समस्या लक्षात घेऊन पालिकेने खारघरमध्ये असलेल्या नागरी आरोग्य केंद्रात रॅपिड अँटिजेन टेस्टची व्यवस्था केली. या टेस्टमुळे कोरोना रुग्णांची ओळख लवकर होत आहे.
अशी होते रॅपिड अँटिजेन टेस्ट:
चाचणीत संदिग्ध व्यक्तीच्या नाकाच्या आतील स्त्राव घेतला जातो. त्यानंतर हा स्त्राव व्हिटीएम द्रावणात मिसळला जातो. त्यानंतर, किटच्या टेस्ट पट्टीच्या एका टोकाला द्रावण टाकले जाते. या पट्टीच्या दुसऱ्या टोकाला एक बारीक गुलाबी रेघ आहे, सुमारे 25 ते 30 मिनिटात द्रावण पट्टीच्या वरच्या भागापर्यंत पोहोचले व तेथे आणखी एक गुलाबी रेघ तयार झाली, तर स्त्राव नमुना पॉझिटिव्ह आहे असे समजले जाते.