जळगाव - रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आरक्षण व तिकीट रद्द करण्यासाठी ८ जूनपासून भुसावळ मंडळात सहा ठिकाणी आरक्षण कार्यालये सुरू करण्यात आली. आरक्षण व तिकीट रद्द करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर एक खिडकी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत एक शिफ्टमध्ये सुरू करण्यात आली आहे.
भुसावळ रेल्वे मंडळात आरक्षण खिडकी सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी सुरुवातीला २२ मार्च ते ३० एप्रिल दरम्यानच्या आरक्षण तिकिटाचा परतावा दिला जात आहे. त्यानंतर पुढील स्लॅबनुसार आरक्षण तिकिटाचा परतावा दिला जाणार आहे. आरक्षणधारकांनी आरक्षण कार्यालयात येताना मास्क लावण्यासह फिजिकल डिस्टंसिंग ठेवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने खबरदारीच्या दृष्टीने अद्याप प्रवासी वाहतूक सुरळीतपणे सुरू केलेली नाही. रेल्वे प्रशासनाने आरक्षण प्रक्रिया सुरू केल्यानंतर अनेक नागरिकांनी आंतरराज्य तसेच राज्याबाहेर जाण्यासाठी आरक्षण केलेले होते. मात्र, लॉकडाऊन वाढल्याने आता आरक्षण रद्द करावे लागणार आहे. जळगाव रेल्वे स्टेशनवर सुरू केलेल्या खिडकीवर सोमवारी दिवसभर अनेकांनी आरक्षण रद्द केले.
असा मिळेल परतावा-
१ ते १५ मे दरम्यानच्या आरक्षण तिकिटाचा परतावा १४ जूनपासून मिळेल.
१६ ते ३१ मे दरम्यानच्या आरक्षण तिकिटाचा परतावा २१ जूनपासून मिळेल.
१ ते ३० जून दरम्यानच्या आरक्षण तिकिटाचे पैसे २८ जूनपासून मिळतील.