चेन्नई - आयपीएलच्या ११ व्या सामन्यात बंगळुरूच्या संघाकडून प्रयास बर्मन याने पदार्पण केले. टी-२० क्रिकेटमध्ये तो सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू बनला आहे. १६ वर्ष १५७ दिवसांचा असताना त्याने पदार्पण केले. यापूर्वी हा विक्रम अफगाणिस्तानच्या मुजीब-उर-रहमान याच्या नावावर होता. मुजीबने १७ वर्ष आणि ११ दिवस वय असताना पदार्पण केले होते.
आयपीएल २०१९ च्या लिलावात बर्मन सर्वात कमी वयाचा खेळाडू होता. त्याच्यावर बंगळुरूच्या संघाने बोली लावली. त्याची ब्रेस प्राईज २० लाख रुपये होती. पण, त्याला दीड कोटीत विकत घेतले. मूळचा बंगालचा असलेला हा लेगस्पिनर इतक्या मोठ्या किमतीला विकला जाईल, असे कुणाला वाटले देखील नव्हते. त्याने लिस्ट 'ए' च्या ९ सामन्यात ११ गडी बाद केले आहेत.
आयपीएल लिलावाच्यावेळी प्रयासने नोंदणीदेखील केली नव्हती. पण लिलावाचे नियोजन तयार होण्यापूर्वी फ्रेंचाईजीनी बंगाल क्रिकेट असोसिएशनकडे प्रयासबाबत विचारणा केली. त्यानंतर बंगाल क्रिकेट असोसिएशनने त्याला फोन करुन नोंदणी करण्यास सांगितले.
६ फुट १ इंच उंच असलेला हा गोलंदाज दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नची बॉलिंग अॅक्शन पाहून गोलंदाज झाला आहे. प्रयासचे पुढे लक्ष्य भारतीय संघात स्थान मिळविण्याचे आहे. सौरव गांगुलीच्यानंतर बंगाल राज्याच्या कोणत्याच खेळाडूला भारतीय संघात दबदबा तयार करता आलेला नाही. प्रयासला पहिल्या सामन्यात गोलंदाजीत छाप सोडता आली नाही, पण फलंदाजीत तो १९ धावा काढल्या.