इस्लामाबाद - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये हिंदू मंदिर बांधण्याचे प्रस्तावित असून जागेभोवती संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू झाले होते. मात्र, कट्टर धार्मिक नेते आणि पक्षांनी विरोध केल्यामुळे मंदिराचे काम खोळंबले होते. मंदिराच्या विरोधात इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. मात्र, न्यायालयाने या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे इस्लामाबादेत श्री कृष्ण मंदिर उभारणीच्या मार्गातला अ़डथळा दुर झाला आहे.इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमर फारूख यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. इन्स्टिट्युट ऑफ हिंदू पंजायत (IHP) ला मंदिर बांधण्यासाठी जागा दिलेली आहे. या जागेवर त्यांना स्वत:च्या निधीतून मंदिर बांधण्यास कोणतीही बंदी नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सोमवारी न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता.
स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानातील अनेक पुरातन हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. इस्लामाबाद शहरात तर हिंदूंसाठी एकही मंदिर नाही. त्यामुळे शहरात मंदिर बांधण्याची मागणी पाकिस्तानातील हिंदू संघटनांकडून होत होती. त्यास परवानगीही देण्यात आली. मात्र, बांधकामाच्या विरोधात याचिका आल्याने मंदिर निर्माण खोळंबले होते.
पंतप्रधान इम्रान खान यांच्या सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक- ए- इन्साफ पक्षाबरोबर आघाडी केलेल्या पाकिस्तान मुस्लिम लिग(कैद) पक्षाने इस्लामाबादेत मंदिर बांधण्यास विरोध केला होता. हा प्रकल्प इस्लामच्या विरुद्ध असल्याचे म्हणत रद्द करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली होती.
भव्य श्री कृष्ण मंदिर इस्लामाबादेत उभे राहणार
शहरातील एच -9 प्रभागात तब्बल 20 हजार स्केअर फुटची जागा मंदिरासाठी प्रस्तावित आहे. या जागेचे भुमीपूजनही करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पाकिस्तानी संसदेच्या मानवी हक्क समितीचे सचिव लाल चंद उपस्थित होते. 2018 मध्ये ही जागा हिंदू पंचायत समितीला देण्यात आली आहे. न्यायालयीन अडथळा दुर झाल्यानंतर आता काम पुन्हा सुरु होईल.