सोलापूर - गेल्या काही दिवसांपासून मंगळवेढा येथील सबजेलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या सबजेलची क्षमता 32 कैद्यांची असताना प्रत्यक्षात येथे 52 कैद्यांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंढरपूर कारागृहातील 10 कैदी मंगळवेढा सबजेलमध्ये वर्ग केल्याने येथील कैद्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या या कारागृहात 48 पुरुष व 2 महिला असे न्यायालयीन कोठडीत एकूण 50 जण आहेत. तर दोन पुरुष पोलिस कोठडीत आहेत. हे सबजेल ब्रिटीश कालावधीमधील कौलारू असल्यामुळे याची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे सर्वत्र छत गळत असते. तसेच या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळे आरोपींना त्यासाठी सातत्याने बाहेर काढावे लागते. त्यामुळे या संधीचा फायदा घेत आरोपी पळून जाण्याची शक्यता नाकारत येत नसल्यामुळे गार्डवरच्या पोलिसांना डोळयात तेल घालून पहारा द्यावा लागतो.
मध्यंतरी या सबजेलमध्ये एक महिला कैदी वगळता 32 कैदी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. सध्या या ठिकाणी 52 कैदी ठेवण्यात आल्याने कोंडवाडयासारखी अवस्था झाली आहे. अशातच, सध्या सर्वत्र कोरोना संसर्ग असल्याने पुन्हा कारागृहात संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच मंगळवेढा पोलिस ठाण्यातील काही अधिकारी व पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने कर्मचार्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी, पोलिस प्रशासनाला तारेवरची कसरत करत आहेत. कमी मनुष्यबळावर पोलिस कर्मचार्यांच्या डबल डयुटया लावून काम करून घेतले जात आहे. अशा स्थितीत पुन्हा पोलिस कर्मचार्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यास पोलिस कर्मचारी कोठून आणाचे असा प्रश्न प्रशासनाला भेडसावत आहे.