मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी अमली पदार्थांच्या सिंडिकेट प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात आहे. गोव्यामधून एका अमली पदार्थ तस्कराला याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हेमल शहा आहे. या अगोदर अटक करण्यात आलेल्या अमली पदार्थ तस्करांच्या चौकशीतून हेमल शहाचे नाव समोर आले होते. हेमल शहा या आरोपीबद्दल माहिती मिळाल्यानंतर एनसीबीकडून सापळा रचण्यात आला होता. गोव्यामधून या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
एप्रिल महिन्यामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबईतील मालाड , परळ व सांताक्रुज परिसरामध्ये छापे मारण्यात आले होते. याठिकाणी काही अमली पदार्थ तस्करांना अटक करून त्यांची चौकशी करण्यात आली होती. या अमली पदार्थ तस्करांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येसंदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात असताना ईडी व सीबीआयकडून सुद्धा तपास केला गेलेला आहे. सीबीआयकडून अद्याप या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आलेला नसून ईडीच्या चौकशीत सुद्धा काही विशेष आढळून आले नव्हते. मात्र, ईडी चौकशी दरम्यान, काही व्हाट्सअॅप चॅट अमली पदार्थांच्या संदर्भात आढळून आल्यानंतर याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सदरचे चॅट देण्यात आले होते. एनसीबीकडून याचा तपास करत सुशांत सिंग राजपूत याची प्रेयसी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्यासह इतर जणांना अटक केली होती. सध्या आरोपी जामिनावर सुटून बाहेर आलेले आहेत.