नांदेड - कोरोनाच्या पार्शवूमीवर सध्या राज्यात लॉकडाऊन लुरू आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये सरकारने काही प्रमाणात शिथिलता देखील आणली आहे. परंतू नांदेडमध्ये ठराविक वेळेनंतरही वाईन्स शॉप सुरू ठेवल्याने पालिकेने आनंद नगरमधील विको वाईन्स शॉपच्या मालकाला दंड केला आहे. पालिकेने वाईन्स शॉप मालकाकडून महापालिकेच्या पथकाने पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला.
याशिवाय तोंडावर मास्क न वापरणाऱ्या 49 जणांकडून प्रत्येकी 200 रुपये याप्रमाणे दंडाची वसूली करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 9 ते 5 या दरम्यान बहुतांश व्यापारपेठ सुरु करण्यासाठी परवानगी दिली गेली आहे. परंतु 5 वाजल्यानंतरही दुकान सुरु ठेवले जात असल्याने महापालिकेच्या पथकाकडून संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येत आहे. चेहऱ्यावर मास्क न वापरता स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता असलेल्या नागरिकांकडूनही दंड वसूली करुन कारवाई केली जात आहे.
मंगळवारी आनंदनगरच्या विको वाईन्सच्या चालकाने सायंकाळी 5 वाजल्यानंतरही दुकान सुरु ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे या वाईन्स शॉपच्या मालकाकडूनपाच हजार रुपयांचा दंड अशोकनगर क्षेत्रिय कार्यालयाकडून वसूल करण्यात आला. त्याच बरोबर शिवाजीनगरच्या क्षेत्रिय कार्यालयाने मास्क न वापरणाऱ्या 11 आणि वजिराबाद झोन 38 अशा 49 नागरिकांकडून प्रत्येकी 200 रुपये या प्रमाणे 9 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला. प्रभारी उपायुक्त विलास भोसीकर, सुधीर इंगोले यांच्या नियंत्रणाखाली वसंत कल्याणकर, किशोर नागठाणे, आर.के.वाघमारे यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनीही ही कारवाई केली.