मुंबई- कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईमधून एकाच दिवशी तब्बल 6191 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज शहरात कोरोनाचे 1437 नवे रुग्ण आढळून आले असून 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी 6 हजाराहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरात आज कोरोनाचे 1437 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 36 हजार 710 वर पोहोचला आहे. मुंबईत 38 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1173 वर पोहोचला आहे. 38 मृतांपैकी 28 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 22 पुरुष व 16 महिला रुग्ण आहेत. मुंबईमध्ये 28 मे पर्यंत 9817 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
आज मुंबईमधून 715 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, 5476 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती कोव्हीड 19 या पोर्टलवर अपलोड केल्याने त्यांचा समावेश आजच्या आकडेवारीत करण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 16008 वर पोहचली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
कोव्हीड बाबत 28 मे पर्यंत 189967 एकूण चाचण्या करण्यात आल्या. 28 मे रोजी 4266 चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले अति जोखमीच्या 8864 व्यक्तींचा शोध घेण्यात आला. मुंबईत झोपडपट्टी आणि चाळीत 700 कंटेनमेंट झोन असून 3110 इमारती सील करण्यात आल्या आहेत.