विशाखापट्टणम - सूर्यकुमार यादवने केलेल्या नाबाद ७१ धावांच्या विजयी खेळीच्या जोरावर मुंबईने चेन्नईला पहिल्या क्वॉलिफायर सामन्यात पराभूत केले. त्यामुळे चेन्नईला अंतिम फेरी गाठण्यासाठी पुन्हा एकदा दुसऱ्या एलिमिनेटर विजेत्याशी सामना करावा लागणार आहे. दुसऱ्या क्वॉलिफायर सामन्यासाठी चेन्नईचा संघ वैजाग येथे पोहोचला आहे. संघा सोबतच महेंद्र सिंह धोनीही त्याची मुलगी जीवा आणि पत्नी साक्षी यांच्यासह वैजागमध्ये दाखल झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्जने या तिघांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टला फॅन्सनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विजय मिळविण्यास सांगत आहेत. फोटोत धोनी तिच्या मुलीचा हात धरून चालत असल्याचे दिसत आहे.
मुंबईविरुद्ध पराभव झाल्यानंतर धोनी फलंदाजांवर चांगलाच बरसला होता. उद्याच्या सामन्यात चेन्नईचे फलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणे औत्सुक्याचा विषय आहे.
दुसरा क्वॉलिफायर सामना १० मे रोजी दिल्लीविरुद्ध होणार आहे. यातील जो संघ सामना जिंकेल त्याला अंतिम सामन्यात मुंबईशी दोन हात करावे लागणार आहेत. आयपीएलचा अंतिम सामना रविवारी १२ मे रोजी हैदराबाद येथे होणार आहे.